जनसंघर्ष सभेला झालेल्या तुरळक गर्दीने गुलाम नबी आझाद यांनी काढली आमदार सत्तार यांची खरडपट्टी, औरंगाबादची जागा राष्ट्रवादीला सोडण्याची काँग्रेसची तयारी

Foto

औरंगाबाद – काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर फज्जा उडाला. त्याचे खापर जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर फुटायला लागले आहे. औरंगाबादमध्ये पक्षाची ताकदच दिसत नसेल तर ही जागा लढवायचीतरी कशाला, असा सूर आता पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडून व्यक्त होत आहे. एवढेच नाही तर, मराठवाड्यातील समारोप सभेला पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे, गुलाम नबी आझाद, प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, नसीम खान उपस्थित होते. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यानंतर ज्यांची नावे घेतली जातात, असे नेते उपस्थित असलेल्या या सभेला झालेल्या तुरळक गर्दीने सत्तार यांची नाचक्की केली. सभा संपल्यानंतर गुलाम नबी आझाद यांनी सत्तार यांची चांगलीच खरडपट्टी काढल्याची कुजबूज आहे.

सत्तार यांच्यावर भडकले गुलाम नबी आझाद

प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या गुडबुकमध्ये असलेले आमदार अब्दुल सत्तार औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. मराठवाड्यातील समारोप सभेच्या निमित्ताने केंद्रीय नेत्यांकडेही आपले स्थान भक्कम करण्याच्या तयारीत असलेल्या आमदार सत्तार यांच्यावर औरंगाबादेतील सभा बुमरँग झाली असल्याची चर्चा आहे. सभेला आपेक्षित गर्दी जमलीच नाही. मागील भागात असलेल्या सर्व खुर्च्या शेवटपर्यंत रिकाम्या होत्या. त्यातच पक्षाचे राज्यसभेतील विरोधीपक्ष नेते गुलाम नबी आझाद भाषणासाठी उभे राहिल्यानंतर अनेक लोक उठून निघायला लागले. तेव्हा आमदार सत्तार यांना त्यांना बसण्याचे वारंवार आवाहन करावे लागले. अजून माझे भाषण बाकी आहेे, असेेही त्यांनी सांगितले. त्यानंतर आझाद यांनी भाषणाला सुरुवात केली. गर्दीचे अनेक विक्रम रचलेल्या मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर अवघी ५-६ हजारांची झालेली गर्दी पाहून सभेनंतर गुलाम नबी आझाद यांनी आमदार सत्तार यांची चांगलीच खरडपट्टी काढल्याची कुजबूज आता समोर येऊ लागली आहे.

औरंगाबादची जागा राष्ट्रवादीला देण्याच्या विचारात हायकमांड

जनसंघर्ष यात्रा समारोप सभेत काँग्रेसमधील अंतर्गत विरोधही उघडपणे समोर आल्याचे चित्र दिसले. औरंगाबाद लोकसभेसाठी काँग्रेसकडून सर्वाधिक चर्चेत असलेले आमदार सुभाष झांबड हे सभेकडे फिरकलेही नाही. त्यांची अनुपस्थिती सभेच्या ठिकाणी चर्चेचा विषय ठरली. तसेच वैजापूरमधील कार्यकर्तेही सभेला दिसले नाही. सभेला फक्त सिल्लोड आणि फुलंब्री तालुक्यातूनच लोक आल्याचे ज्येष्ठ नेत्यांच्या निदर्शणास आले. त्यामुळे ही जनसंघर्ष सभा आमदार सत्तार आणि माजी आमदार कल्याण काळे यांचा स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठीचाच संघर्ष होता की काय, असा सवाल खासगीत अनेक नेते विचारत आहेत. पक्षातील सुंदोपसुंदी आणि एकमेकांविरोधात सुरु असलेले कुरघोडीचे राजकारण पाहून औरंगाबादची जागा राष्ट्रवादीला सोडण्याचा विचार हायकमांड करत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

औरंगाबादच्या जागेवर काँग्रेस सातत्याने पराभूत होत आहे, त्यामुळे ही जागा लोकसभा २०१९ मध्ये राष्ट्रवादीला सोडण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गेल्या काही दिवसांपासून करत आहेत. राष्ट्रवादीचे पदवीधर मतदार संघातील आमदार सतीश चव्हाण येथे शड्डू ठोकून तयार आहेत. राष्ट्रवादीच्या या मागणीवर आता काँग्रेसमधील ज्येष्ठ नेतेही गांभीर्याने विचार करु लागले असल्याचे बोलले जात आहे.

औरंगाबादच्या बदल्यात नगर घेण्याची काँग्रेसची तयारी

औरंगाबादची पडलेली जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देऊन अहमदनगरची जागा काँग्रेसकडे घेण्याची चर्चा दोन्ही पक्षांच्या नेत्यात सुरु आहे. काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी नुकतीच जागावाटपाची चर्चा झाली. यात ४० जागांवर उभय पक्षांचे एकमत झाले. मात्र औरंगाबाद, दक्षिण अहमदनगर, पुणे आणि उत्तर मुंबई या जागांची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. त्यामुळे चर्चा अडली होती. या चार जागांपैकी औरंगाबादची जागा राष्ट्रवादीला सोडून अहमदनगर आपल्या पारड्यात पाडून घेण्याची काँग्रेसची तयारी सुरु आहे. येथून विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे लोकसभा लढवण्यास इच्छूक आहे. राधाकृष्ण विखे यांचा नगरमध्ये असलेला राजकीय दबदबा ही जागा सहज जिंकून देऊ शकतो, असा विश्वास हायकमांडला वाटत असल्यामुळे ही अदलाबदल शक्य असल्याचे बोलले जाते.